माहिती

वनसंपदा-

लिफ्ट एरिगेशन द्वारे सर्वत्र पाणी पोहचल्यामुळे प्रत्येकाच्या बांधाला नारळ, सागवान, लिंब, आंबा. इ. झाडांची मोठया प्रमाणात लागवड झाली आहे. गावाच्या दक्षिणेस नविन शिवाजीनगर नावाच्या माळवाडी गावाचाच एक भाग वसलेला आहे. तेथे प्रत्येक घरी व प्रत्येकाच्या प्लॉटवरती नारळ, आंबा, चिकू, सागवान, इ. झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे तो भाग वनराईने नटल्यासारखा दिसतो.

स्वच्छता-

स्वच्छतेसाठी नेहमीच गाव आग्रही आहे. संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये गावाने सातत्याने सहभाग घेतला आहे व बक्षिसही मिळविले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी गावात स्वच्छता मोहिम राबविली जाते. पावसाळयात डासांच्या प्रादुर्भाव होऊनये म्हणून औषधे फवारणी केली जातात. पिण्याच्या पाण्यासाठी उत्तम सोय आहे. पाणी दररोज शुध्दीकरण करूनच सोडले जाते. परिणामी पावसाळी आजाराची लागण होत नाही. गावात भारती विद्यापीठ, आदर्श शाळेतील व जि.प. शाळेतील विद्यार्थी वेळोवेळी परिसराची स्वच्छता करतात.

जलस्त्रोत-

गावाच्या पश्चिमेला दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून बारमाही कृष्णा नदी वाहते त्यामुळे लिफ्ट एरिगेशनद्वारे शेतीला पाणी पुरविले जाते. तसेच गावाच्या हद्दीतील शेतीमधून कॅनॉल गेला आहे. गावामध्ये २०० हून अधिक विहिरी, बोअरवेल आहेत. शेतीसाठी बारमाही जलसिंचनाची सोय असलेमुळे गाव हिरवेगार व धनधान्याने समृध्द आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी माळवाडी, खंडोबाची वाडी व चापडेवाडी मिळून प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना आहे. ही योजना ग्रामपंचायत माळवाडी उत्तमप्रकारे चालवते. स्वच्छ निर्जंतूक व डब्बलफिल्टर्ड पाणी मिळते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले आहे व कधीही साथीचे रोग पसरले नाहीत. पिण्याच्या पाण्याची टाकीची क्षमता ६ लाख १०,००० लिटर आहे.

फळबागा-

गावातील शेतकरी हा आधुनिकतेची कास धरणारा आहे. पारंपारीक पिकांबरोबर द्राक्षबागेवर येथील शेतकरी जास्त लक्ष देतो व द्राक्षे परदेशातही पाठवण्यास सुरूवात केली आहे.

प्राणीसंपदा-

गावात शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा केला जातो. त्यामुळे गावात म्हैशी व गाईंची संख्या मोठया प्रमाणात आहे. १५ दिवसाला दुधाचे पगार होत असलेने शेतकरी या व्यवसायाकडे बहुसंख्येने वळले आहेत. पलूस तालुक्यात माळवाडी हे गांव दुध उत्पादनात अग्रेसर आहे. जवळच आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविलेला चितळे डेअरीचा दुध संकलन व प्रॉडक्ट बनविणारा प्लॅन्ट आहे. दुध संस्थामार्फत अर्थसाहय्य मिळत असलेने युवकांनी दुध व्यवसाय हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन केले आहे. गावात २०० बैल असून या बैलांचा उपयोग शेतीच्या मषागतीसाठी केला जातो. तसेच शेळया मेंढया ३००० व १००० म्हैशी व ५०० गाई आहेत.